मिश्र, वीरेंद्रनाथ : (१७ ऑगस्ट १९३५ — ३१ ऑक्टोबर २०१५). प्रसिद्ध भारतीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फरुकाबाद जिल्ह्यातील खंडौली या छोट्या गावात झाला. कानपूरमधून इतिहास विषयात बी. ए. ची पदवी घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते लखनौला गेले (१९५५). दरम्यान त्यांनी संस्कृतचेही शिक्षण घेतले होते. लखनौ विद्यापीठातून त्यांनी मानवशास्त्रात एम. ए. ही पदवी संपादन केली (१९५७). येथे त्यांना विख्यात मानवशास्त्रज्ञ डी. एन. मजुमदार यांचे मार्गदर्शन लाभले. मानवशास्त्राचा अभ्यास करत असताना मिश्र यांना पुरातत्त्व विषयात आवड निर्माण झाली.

मिश्र यांनी लखनौ विद्यापीठात काही महिने त्यांनी व्याख्याता म्हणून काम केले. मजुमदार यांच्या सल्ल्यानुसार ते पुरातत्त्वात संशोधन करण्यासाठी डेक्कन कॉलेज, पुणे येथे आले (१९५८) आणि ह. धी. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच.डी पदवी संपादन केली (१९६१). ‘स्टोन एज कल्चर्स ऑफ राजपुताना’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. पुढे ते लखनौ विद्यापीठात एक वर्ष व्याख्याता पदावर रुजू झाले आणि नंतर डेक्कन कॉलेजमध्ये आले. डेक्कन कॉलेजमधून प्राध्यापक पदावरून १९९५ मध्ये ते निवृत्त झाले. डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.

मिश्र यांना प्रामुख्याने प्रागैतिहासिक व इतिहासपूर्व संस्कृती आणि विविध जमातींच्या लोकजीवनाच्या अभ्यासाची आवड होती. त्यांनी १९६२ ते १९६५ या काळात राजस्थानातील उदयपूर, भिलवाडा आणि चितोडगड या भागांत सर्वेक्षण केले. या दरम्यान त्यांनी अनेक आद्य पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि ताम्रपाषाणयुगीन पुरास्थळांचा शोध लावला. त्यांनी बारमेर जिल्ह्यातील तिलवाडा आणि भिलवाडा जिल्ह्यातील बागोर येथे उत्खनन केले. नंतरच्या काळात त्यांनी उदयपूर जिल्ह्यातील बालाथल येथे १९९४ ते २००० असे दीर्घकाळ उत्खनन केले. ताम्रपाषाणयुगीन पुरातत्त्व संशोधनातील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. कारण इ. स. पू. ३७०० मध्ये हडप्पाशी संबंध नसलेले, पशुपालन व कृषिवर उपजीविका असलेले खेडेगाव अस्तित्वात असल्याचे प्रथमच सिद्ध झाले होते.

मिश्र यांचे प्रागैतिहासिक संशोधन प्रामुख्याने राजस्थान व मध्य प्रदेशातील आहे. त्यांनी आणि वि. श्री. वाकणकर यांनी मिळून भीमबेटका येथे १९७३ ते १९७७ असे पाच वर्षे उत्खनन केले. या उत्खननामधून त्यांना अशुलियन या प्रागैतिहासिक संस्कृतीपासून ते मध्याश्मयुगापर्यंतचे पुरावशेष मिळाले. मिश्र आणि त्यांचे सहकारी शरद राजगुरू, ए. के. सिंघवी, गुरदीप सिंग व डी. पी. अगरवाल यांनी राजस्थानात १९७७ ते १९८३ दरम्यान सिंगी तलाव, जायल, सोळा-आर आणि इंदोला की धानी अशा अनेक पुरास्थळांवर संशोधन केले. पुरापर्यावरणाच्या अभ्यासातील हा एक मैलाचा दगड मानला जातो. मध्य प्रदेशात नर्मदा नदीच्या खोऱ्यात मिश्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आद्य पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग आणि मध्याश्मयुग या कालखंडांमधील पुरास्थळांचा शोध लावला (१९८६-९०). तसेच त्यांनी नरसिंगपूर जिल्ह्यातील समनापूर या मध्य पुराश्मयुग स्थळाचे उत्खनन केले. भारतातील प्रागैतिहासिक संशोधनाची दखल जागतिक पातळीवर घेतली जाण्याचे श्रेय मिश्र यांना दिले जाते.

गोंड, पारधी, वनवाघरी, कंजार, काळबेलीया, भिल्ल आणि कुचबंदीया अशा अनेक जमातींच्या लोकजीवनाचा अभ्यास हे मिश्र यांचे महत्त्वाचे योगदान आहे. या कामात त्यांना त्यांच्या सहकारी मालती नागर यांची साथ मिळाली. मिश्र, मालती नागर आणि एम. एल. के. मूर्ती यांनी मिळून भारतात लोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्व (Ethnoarchaeology) या शाखेचा पाया घातला. मिश्रांकडे लोकांमध्ये मिसळण्याची विलक्षण कला होती. अनेक बोलीभाषांवरील प्रभुत्वामुळे ते सहज गप्पाटप्पा करत आणि मग त्यांना हवी ती माहिती मिळत असे. इतकेच नाही तर रानात फिरताना भेटलेल्या डाकूंशी अनेकदा बोलून त्यांना पुरातत्त्व म्हणजे काय हे त्यांनी समजावून दिले. मातृभाषा हिंदीखेरीज मराठी, इंग्लिश, जर्मन, फ्रेंच अशा अनेक भाषा मिश्र यांना अवगत होत्या.

मिश्र यांनी पुरातत्त्व आणि मुख्यतः प्रागितिहास या शाखेच्या वाढीसाठी कार्य केले. त्यांनी स्वराज्यप्रकाश गुप्ता, दिलीप चक्रवर्ती आणि डी. पी. अगरवाल यांच्या मदतीने प्रागैतिहासाचा विशेष अभ्यास करण्यासाठी इंडियन सोसायटी फॅार प्रिहिस्टॉरिक अँड क्वाटर्नरी स्टडीज ही संस्था स्थापन केली (१९७७) आणि मॅन अँड इन्व्हायरनमंट हे आंतरराष्ट्रीय नियतकालिक सुरू केले. ते गेली चाळीस वर्षे सुरू आहे. मिश्र यांनी अखेरपर्यंत या नियतकालिकाचे संपादन केले. लेखन आणि संपादनात काटेकोरपणा, दर्जा आणि अचूकता यांबाबत ते कमालीचे आग्रही होते.

मिश्र यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवीस विद्यार्थ्यांनी पीएच.डी प्राप्त केली. त्यांचे एकशे वीस शोधनिबंध प्रसिद्ध असून त्यांनी पाच पुस्तकांचे लेखन व संपादन केले आहे. मिश्र यांना अनेक मानसन्मान लाभले. बर्कलीच्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाची त्यांना फुलब्राइट शिष्यवृत्ती मिळाली (१९८४). त्यांचे गुरू डी. एन. मजुमदार यांच्या नावाचे पदक मिळवण्याचा मान त्यांना लाभला (२००२). भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेचे (आयसीएचआर) ते राष्ट्रीय सन्मान्य सभासद (नॅशनल फेलो) होते (२०००-२००३). तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाचे ते सुप्रतिष्ठित प्राध्यापक होते (२००३-२००५). मध्य प्रदेश शासनाने वि. श्री. वाकणकर या पदकाने त्यांचा सन्मान केला (२००७). तसेच प्रागैतिहासातील योगदानासाठी श्रीलंका सरकारने त्यांचा देरयानिगला पदकाने सन्मान केला (२०१४).

पुणे येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Kanungo, A. K. Ed., Gurudakshina : Facets of Indian Archaeology; Essays Presented to Prof. V.N. Misra, (Volume 1 and 2), Oxford, 2005.
  • Paddayya, K. ‘Obituary : Virendra Nath Misra’, Man and Environment,  40 (2) : 109-111, 2015.

                                                                                                                                                                                  समीक्षक : सुषमा देव