ऐतिहासिक पुरातत्त्वाची एक उपशाखा. इतिहासातील विविध संघर्षांकडे पुरातत्त्वीय दृष्टीकोनातून पाहण्याच्या संकल्पनेतून विसाव्या शतकाच्या अखेरीस ही शाखा उदयास आली.

प्रायमेट गणातील इतर अनेक प्राण्यांप्रमाणे मानवांमध्येही निरनिराळ्या कारणांसाठी परस्परांमध्ये स्पर्धा, संघर्ष आणि त्याचे हिंसेत रूपांतर होणे हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. इतर प्रायमेट प्राण्यांप्रमाणेच जगण्यासाठी झगडणे ही उत्क्रांतीमधून आलेली उपजत जैविक क्षमता आहे. अन्न, पाणी, रहिवासाची जागा अशा निरनिराळया नैसर्गिक संसाधनांसाठीची जैविक स्पर्धा याव्यतिरिक्त संघर्षाची इतर कारणे आहेत. अशी कारणे वांशिक, सामाजिक व धार्मिक श्रेष्ठत्वाच्या कल्पनांशी निगडित असतात. संघर्षाच्या अनेक पातळ्यांचा आणि संघर्षाच्या विविध स्वरूपांचा विचार सांस्कृतिक मानवशास्त्रात केला गेला आहे. मानवी संघर्षाचे स्वरूप व त्याचे परिणाम यासंबंधी समाजविज्ञानात अनेक सिद्धांत मांडण्यात आले आहेत.

मेडन कॅसल येथील दफने.

मानवी इतिहासात अतिप्राचीन काळापासून विविध लोकसमूहांमध्ये आणि लोकसमूहांच्या अंतर्गत संघर्ष उडाल्याची असंख्य उदाहरणे आहेत. पुरातत्त्वीय अभ्यासामधून प्रागैतिहासिक काळातही लोकसमूहांमध्ये संघर्ष झाला असल्याचे दिसून येते. राजकीय प्रभुत्वासाठी, जमिनीवरील मालकी हक्कांसाठी आणि इतर अनेक कारणांसाठी सत्ताधारी घराणी, विविध स्थानिक गट, प्रादेशिक लोकसमूह, वांशिक गट, आर्थिक-सामाजिक वर्ग आणि राष्ट्रे यांच्या दरम्यान संघर्ष उफाळून येतात. अनेकदा अशा संघर्षात हिंसाचार होतो. राष्ट्राराष्ट्रांमध्ये लढाया आणि दीर्घकालीन युद्धे होतात. तसेच अनेकदा राज्य-नागरीक यांच्यामध्ये हक्क व राजकीय कारणांसाठी मतभेद व तीव्र संघर्षाचे प्रसंग येतात. काही राज्ये लोकांवर दडपशाही करून त्यांना बंदिवासात टाकतात. दडपले गेलेले लोक त्यांच्या कुवतीनुसार प्रतिकार करतात. दोन्हींत हिंसाचार घडतो. आर्थिक विषमतेच्या जाणिवेतून घडणारी वर्गयुद्धे आणि त्यांतून घडणारा हिंसाचार हा देखील संघर्षाचा एक प्रकार आहे.

कोणत्याही कारणांसाठी विविध सामाजिक स्तरांवर एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याची मानवी वृत्ती आणि त्याला प्रतिकार करण्याची नैसर्गिक उर्मी हा सर्व प्रकारच्या संघर्षाचा गाभा आहे. ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ सर मॅार्टिमर व्हीलर (१८९० — १९७६) यांना इंग्लंडमधील डोर्सेट येथे असलेल्या मेडन कॅसल या प्रचंड मोठ्या किल्ल्याच्या उत्खननात काही दफने आढळली (१९३४-३७). ही दफने स्थनिक लोकांच्या रोमन लोकांशी झालेल्या युद्धातील आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले होते. तथापि व्हीलर हे स्वतः लष्करी पेशातले असल्याने हा निष्कर्ष पूर्वग्रहांवर आधारलेला होता. त्यामुळे मेडन कॅसल उत्खनन हे संघर्षाच्या पुरातत्त्वाचे उदाहरण नाही, असे मानले जाते.

काळा वारसा अप्रवासी घाट : सध्याच्या पोर्ट लुई मधील कंत्राटी मजुरांना मॉरिशसमध्ये प्रवेश देण्याची जागा.

संघर्षांचा पुरातत्त्वीय विचार करताना कोणत्या संशोधन पद्धती वापराव्यात यांसंबंधी मंथन करण्यासाठी पहिली आंतरराष्ट्रीय परिषद स्कॉटलंडमधील ग्लासगो विद्यापीठात भरली (२०००). त्यानंतर या विषयातील संशोधनाला प्रसिद्धी देण्यासाठी जर्नल ऑफ कॉनफ्लिक्ट आर्किओलॅाजी हे नियतकालिक सुरू झाले (२००५). संघर्षाचे पुरातत्त्व हे बहुविद्याशाखीय क्षेत्र असून त्यात पुरातत्त्वाखेरीज इतिहास, मानवशास्त्र, सांस्कृतिक भूगोल, संग्रहालयशास्त्र, वारसास्थळ व्यवस्थापन आणि सांस्कृतिक पर्यटन यांचे योगदान आहे. सुरुवातीला फक्त विसाव्या शतकातील युद्धांमधील निरनिराळ्या लढायांच्या स्थळांवरील अवशेषांचा पुरातत्त्वीय अभ्यास करणे, एवढाच या विषयाचा आवाका होता; तथापि आता या क्षेत्रात सर्व प्रकारच्या संघर्षांचा पुरातत्त्वीय दृष्टीने विचार केला जातो. त्यामुळे लष्करी पुरातत्त्व या मूळ संशोधन क्षेत्राखेरीज रणभूमी पुरातत्त्व, यादवीयुद्धांचे पुरातत्त्व, शीतयुद्धाचे पुरातत्त्व, बंकरचे पुरातत्त्व, गुलामगिरीशी निगडित स्थळांचे पुरातत्त्व, तुरुंगगवासाचे पुरातत्त्व, बंदिछावण्यांचे पुरातत्त्व, गुलाग श्रमछावण्यांचे पुरातत्त्व, गुन्हेगारांच्या वसाहतींचे पुरातत्त्व, वंशसंघर्षाचे पुरातत्त्व, वर्गलढ्याचे पुरातत्त्व, दडपशाही व प्रतिकाराचे पुरातत्त्व, जनसंहाराचे पुरातत्त्व आणि अधिक व्यापक व सर्वसमावेशक उद्दिष्टे असणारे हिंसाचाराचे पुरातत्त्व अशा विविध विषयांचा समावेश संघर्षाच्या पुरातत्त्वात होतो. तसेच यात आधुनिकच नव्हे, तर प्रागैतिहासिक काळातील संघर्षांचा विचार केला जातो. याशिवाय प्राचीन काळात लढण्यासाठी वापरल्या गेलेल्या शस्त्रास्त्रांच्या पुरातत्त्वीय संशोधनाचा समावेश संघर्षाच्या पुरातत्त्वात होतो. या विषयाची व्याप्ती आता वाढली असून काही शतकांपूर्वी चेटकिणी असल्याच्या अंधश्रद्धेपोटी यूरोप व अमेरिकेत सामूहिक हत्या झालेल्या लोकांच्या दफनस्थळांचा अभ्यास संघर्षांच्या पुरातत्त्वात समाविष्ट झाला आहे.

संघर्षांच्या कोणत्याही घटनेबद्दल पारंपरिक ऐतिहासिक साधनांमधून मिळालेल्या माहितीत भर घालणे, ऐतिहासिक निष्कर्षांना पुष्टी देणे अथवा निष्कर्षांमध्ये सुधारणा करणे हा संघर्षाच्या पुरातत्त्वाचा मुख्य उद्देश आहे. संघर्षांचा पुरातत्त्वीय अभ्यास करताना अवशेषांची नोंदणी, विश्लेषण आणि पुराव्यांचा अर्थ लावण्यासाठी पुरातत्त्वीय विज्ञानाचा उपयोग ही सर्वसामान्य पद्धतच वापरली जाते. फक्त पुराव्याचे स्वरूप निराळे असते. रणभूमींवरील खंदक, बंकर, लष्कराच्या बराकी, युद्धकैद्यांच्या छावण्या, कैद्यांच्या कोठड्या, हत्यारांचे तुकडे, उद्ध्वस्त झालेले रणगाडे व इतर वाहने, दारूगोळ्यांचे अवशेष, सैनिकांच्या व्यक्तिगत वापराच्या वस्तू, सामूहिक दफनस्थळे, सांगाडे, इत्यादी सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो. संघर्षाच्या पुरातत्त्वात निष्कर्ष काढताना उपलब्ध असतील त्या सर्व लिखित पुराव्यांचा व दस्तऐवजांचा विचार केला जातो. तसेच विसाव्या शतकातील संघर्षांचा अभ्यास करताना कैद्यांच्या आठवणी आणि सैनिकांच्या मुलाखतींमधून मिळालेली माहिती अशा मौखिक साधनांचाही उपयोग केला जातो. विसाव्या शतकातील संघर्षाच्या कटू स्मृती जनमानसांत अद्याप ताज्या असल्याने असा अभ्यास करताना अधिक संवेदनशीलता बाळगली जाते.

संघर्षाचे पुरातत्त्व या क्षेत्राच्या उदयानंतर सांस्कृतिक वारशाच्या संकल्पनेत, सांस्कृतिक वारसा नकारात्मक स्वरूपाचाही असू शकतो, असा बदल झाला. त्याला ’काळा वारसा’ (Dark Heritage) असे म्हणतात. ऐतिहासिक काळात काही नकारात्मक गोष्टी घडल्या व त्या मानवजातीने भविष्यात टाळायच्या आहेत, याची जाणीव पुढील पिढ्यांना करून देण्यासाठी अशा नकारात्मक वारसा स्थळांचा उपयोग होतो. एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांनी भारतातून नेलेल्या बांधील मजूरांना (Indentured labour) मॉरिशसमध्ये प्रवेश देण्याची जागा ’अप्रवासी घाट’, वेस्ट इंडीजमध्ये मळ्यांवर राबणार्‍या आफ्रिकन गुलामांच्या वसाहती, द्वितीय महायुद्धाच्या काळातील आऊसवित्झ व ट्रेब्लिन्का सारखी ज्यू लोकांच्या जनसंहाराची केंद्रे, राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी तत्कालीन सोव्हिएत महासंघात निर्माण केल्या गेलेल्या ’गुलाग’ यंत्रणेच्या छळछावण्या आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांना शिक्षा करण्यासाठी वापरलेला अंदमानातील सेल्युलर जेल ही संघर्षाशी निगडीत काळ्या वारशाची काही उदाहरणे आहेत.

संदर्भ :

  • Fernández-Götz, Manuel &  Roymans, Nico, Conflict Archaeology : Materialities of Collective Violence from Prehistory to Late Antiquity, Routledge, 2017.
  • Haas, J. Ed., The Anthropology of War, Cambridge, 1990.
  • Lennon, J. & Foley, M. Dark Tourism : The attraction of death and disaster, London, 2007.
  • Meskell, L. ‘Sites of Violence : Terrorism, Tourism, and Heritage in the Archaeological Present’, Embedding Ethics (L. M. Meskell & P. Pels Eds.), pp. 123-146, Oxford, 2005.
  • Ralph, Sarah Ed., The Archaeology of Violence :  Interdisciplinary Approaches, 2013.

                                                                                                                                                                            समीक्षक : सुषमा देव