प्राचीन ईजिप्तमधील अतिशय महत्त्वाची आणि लोकप्रिय देवता. आयसिस, इसेत, आसेत असेही तिच्या नावाचे उच्चार केले जातात.
विश्वोत्पत्तिशास्त्रानुसार आकाशदेवता नट आणि पृथ्वीदेवता गेब ह्या दांपत्याची ती पहिली कन्या असून ओसायरिसची बहीण व पत्नी; सेथ, नेफ्थिस, थोरला होरस यांची बहीण आणि धाकट्या होरसची आई होय. अनुबिसला दत्तक घेतल्याने त्याचीही ती आई समजली जाते. तसेच होरसच्या सुफलनदेवता मिनशी असणार्या एकीकरणामुळे ती मिनचीही माता समजली जाते. त्याचप्रमाणे आपिस नावाच्या वृषभरूप देवतेचे मातृत्वही तिच्याकडेच आहे. काही ठिकाणी ह्या देवतांची पत्नी म्हणूनही तिचा संदर्भ येतो.
सेथने मत्सरापोटी आपला कर्तबगार भाऊ ओसायरिसला कपटाने मारले आणि त्याचे प्रेत पेटीत बंद करून नाईल नदीत फेकले. इसिसने ती पेटी मिळवली; पण सेथने पुन्हा त्या पेटीतील प्रेताचे चौदा तुकडे करून ते ईजिप्तभर विखरून टाकले. इसिसने ते सर्व तुकडे मिळवले आणि ते एकत्र शिवून जादूने ओसायरिसला पुनर्जीवित केले, अशी पुराणकथा आहे. प्रेत जोपर्यंत टिकून राहाते, तोपर्यंत मृतास पुन्हा जिवंत करता येते वा त्याला मरणोत्तर सद्गती मिळते, ह्या कल्पनेतून ईजिप्तमध्ये ‘ममी’ करण्याची प्रथा सुरू झाली असावी. तिच्याच आदेशानुसार अनुबिस आणि थोथ ह्यांनी ओसायरिसची ममी तयार केली. त्यामुळे इसिसला मृतांची रक्षकदेवता समजली जाते. ती नेफ्थिस, सेल्केत वगैरे देवतांबरोबर ममीचे अंतर्गत अवयव ठेवलेल्या पेट्यांचेही रक्षण करते.
नाईलच्या वार्षिक पुराचा संबंध इसिसने ओसायरिसच्या मृत्यूनंतर केलेल्या शोकाशी आणि तिने ढाळलेल्या अश्रूंशी जोडला जातो. ओसायरिसच्या पुनर्जीवित देहापासून तिने जादूने पुत्रप्राप्ती करून घेतली. प्राचीन ईजिप्तमधील बहुतांश यातुक्रियांमध्ये, त्यातही रक्षण आणि रोगोपचारविषयक यातुक्रियांमध्ये, इसिसला विशेष महत्त्वाचे स्थान होते. ती बाळंतपणाची देवता असल्याने तिच्या पूजक स्त्रिया, उत्तम वैद्य आणि सुईणीही असत, असे उल्लेख सापडतात.
त्याचप्रमाणे ओसायरिसच्या माघारी इसिसने नाईलच्या वाळवंटी भागात दडून राहात असलेल्या होरसचे त्याचा काका सेथपासून आणि वाळवंटातील विंचू, साप, वगैरे विषारी प्राण्यांपासून रक्षण केले. तसेच ईजिप्तचे राज्य परत मिळवण्यासाठी त्याला सक्षम बनवले. ह्या तिच्या कार्यांमुळे इसिस ही मुलांची रक्षणकर्त्री निसर्गदेवताही समजली जाते.
आद्य राणी आणि राजमाता असल्याने तिचा राजसत्तेची प्राप्ती आणि रक्षण ह्यांतही सहभाग असतो. तिच्या मस्तकावरील सिंहासनाची छबी असणारा मुकुट ह्याचेच द्योतक आहे. राजा हा तिचा होरसरूपी पुत्र समजला जात असून, तिनेच त्याला सिंहासनाची प्राप्ती करून दिल्याचे मानले जाते. इसिस नावाचा व्युत्पत्तिसिद्ध अर्थ सिंहासनाधिष्ठित राणी असा केला जातो. असे असूनही दीनदुबळ्यांची, गरिबांची, सेवकांची देवता म्हणूनही तिचे महत्त्व आहे.
इसिस आदर्श पत्नी आणि आदर्श माता समजली जाते. तिच्या नावाचा सामान्य अर्थच मातृदेवता असा केला जातो. अगदी जुन्या राजवटीच्या काळापासूनच इसिस ही संपूर्ण ईजिप्तभर पुजली जाणारी एक महत्त्वाची देवता होती. इसिस, ओसायरिस आणि होरस या त्रिमूर्तीची संपूर्ण ईजिप्तमध्ये पूजा चाले, त्यांचे उत्सव साजरे होत, मिरवणुका निघत आणि तीर्थयात्रा केल्या जात. फिली, बेहबेट ही इसिसच्या संप्रदायाची मुख्य केंद्रे होती.
हाथोर ह्या गोरूप मातृदेवतेबरोबर एकत्रितपणेही तिचे पूजन केले जात असे. त्यांचे एकीकरण झाल्यानंतरच्या काळात इसिसलाही हाथोरप्रमाणे गायीच्या शिंगांमध्ये सूर्याचा गोल असणारा मुकुट घातलेला दिसतो.
आयुष्यसूचक तेत/टिजेटनामक चिन्ह इसिसशी जोडलेले आहे. त्याला इसिसची गाठ किंवा इसिसचे रक्त अशीही नावे आहेत. त्याचा वापर और्ध्वदेहिकांत पुनरुत्थान किंवा पुनर्जन्माच्या संदर्भात केला जात असे. चित्रलिपीत इसिसचे नाव लिहिताना सिंहासनाचे चिन्ह, त्यानंतर अर्धवर्तुळ आणि शेवटी मातृदेवता इसिसचे चित्र असते.
इसिसचे प्रतिबिंब नंतरच्या ग्रीक-रोमन वगैरे दैवतशास्त्रांतही पडलेले दिसते. तिचे एकीकरण पर्सेफोनी, अथेना, दिमितर वगैरे देवतांशी केलेले आढळते. अनेकदा मदर मेरीशीही तिचा संबंध जोडलेला दिसतो. इटलीमधील पॉम्पेई येथेही तिचे मोठे मंदिर सापडते. ह्यावरून इतर देशांतही तिचे मोठे प्रस्थ असल्याचे उघड होते.
संदर्भ :
- Bunson, Margaret, Encyclopaedia of Ancient Egypt, New York, 2012.
- Remler, Pat, Egyptian Mythology A to Z, New York, 2010.
समीक्षक : शकुंतला गावडे