सामाजिक शास्त्रांचे अध्ययन, अध्यापन आणि संशोधन करणारी एक ख्यातनाम शैक्षणिक संस्था. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स अर्थात ‘एलएसई’ या नावाने ती परिचित आहे. या संस्थेची स्थापना इ. स. १८९५ मध्ये फेबिअन सोसायटी या यूरोपातील एका महत्त्वाच्या तत्कालीन सामाजिक चळवळीतील विचारवंत दाम्पत्य सिडनी वेब आणि बिॲट्रीस वेब यांनी केली. तसेच ग्रॅहम वॅलास आणि जॉर्ज बर्नार्ड शॉ अशा दिग्गज विचारवंतांचासुद्धा या संस्थेसाठी महत्त्वाचा वाटा आहे. मध्य लंडनमधील वेस्टमिन्स्टर भागातील क्लेर मार्केट येथे ही संस्था सुरू झाली. पुढे इ. स. १९०० मध्ये ती लंडन विद्यापीठाला जोडली गेली. इ. स. १९०१ पासून तेथे पदवी अभ्यासक्रम सुरू झाला; मात्र पुढे सुमारे शतकभराच्या काळानंतर म्हणजे २००८ पासून या संस्थेने स्वतःच्या पदव्या देण्यास सुरुवात केली.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेचे स्थान जगातील पहिल्या पन्नास विद्यापीठांच्या यादीत निर्विवादपणे आहे. या संस्थेत सध्या सुमारे १५५ देशांचे नागरिक असलेले १०,००० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे सुमारे ३,३०० कर्मचारी असून त्यांपैकी निम्मे ब्रिटन बाहेरचे आहेत. २०१५-१६ मध्ये संस्थेचे एकत्रित उत्पन्न ३४०.७ पौंड होते. त्यात ३०.३ दशलक्ष पौंड संशोधन अनुदाने होती. सर्व ब्रिटिश विद्यापीठांमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी असणारी ही एकमेव संस्था आहे.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत सुरू असलेल्या अनेक अभ्यासक्रमांच्या अध्यापनातील नाविन्य आणि वैशिष्ट्यांनी संस्थेचे वेगळेपण उठून दिसते. संपूर्ण देशात अध्यापनयुक्त पद्व्युत्तर कार्यक्रम सर्वप्रथम सुरू करण्याचा मान याच संस्थेला मिळाला आहे. संस्थेने पदवीपातळीवरील अध्यापनाचे महत्त्व जाणलेले आहे. तसेच अगदी वरिष्ठ आणि अनुभवी प्राध्यापकांनाही पदवीच्या प्रथम वर्षाचा निदान एक तरी अभ्यासक्रम येथे शिकवावा लागतो; मात्र संशोधनप्रेरित अध्यापनाला संस्था अतिशय महत्त्व देते. एकंदरीतच, संस्थेने ‘कसे’ या प्रश्नाऐवजी ‘का’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्यावर भर दिलेला आहे. येथील अभ्यासक्रमात तंत्रांपेक्षा विश्लेषणावर जास्त भर दिला जातो.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ही संस्था सामाजिक शास्त्रांतील विविध विषयांच्या विभागांनी परिपूर्ण आहे. हे विभाग पुढीलप्रमाणे आहेत : लेखा, मानवशास्त्र, आर्थिक इतिहास, अर्थशास्त्र, वित्त, भूगोल व पर्यावरण, लिंगविषयक अभ्यास, आरोग्य धोरण, शासन, आंतरराष्ट्रीय विकास, आंतरराष्ट्रीय इतिहास, आंतरराष्ट्रीय संबंध, विधी, व्यवस्थापन, गणित, संवादमाध्यमे, अभ्यास पद्धती, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र व शास्त्रीय पद्धती, मानसशास्त्र व वर्तनवादी शास्त्र, सामाजिक धोरण, समाजशास्त्र, संख्याशास्त्र, यूरोपियन संस्था, आंतरराष्ट्रीय विषमता संस्था, सार्वजनिक घडामोडींविषयक अभ्यास, भाषा केंद्र आणि दानधर्म व सामाजिक उद्योजकतेची मार्शल संस्था. यावरून विविध सामाजिक शास्त्रांमधील सांधेजोड करण्याचे उद्दिष्ट ‘एलएसई’ने बाळगलेले दिसून येते.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेचा कल ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग करण्याकडे सुरुवातीपासूनच राहिलेला आहे. आपल्या विद्यार्थ्यांना बदलत्या परिस्थितीत जगण्यास सक्षम करण्यात संस्थेने अतिशय मोलाची भूमिका बजावली आहे. आपल्या अभ्यासक्रमाद्वारे धार्मिक, आर्थिक, राजकीय, वर्गीय अशा कोणत्याही बंदिस्त विचारसरणीपासून अलिप्त राहून केवळ शैक्षणिक स्वातंत्र्य देण्यावर संस्थेने जोर दिलेला आहे. आपल्या विद्यार्थ्यांना एक स्वतंत्र प्रौढ व्यक्तिमत्त्व म्हणून वागविण्याची येथे परंपरा आहे. त्यासाठी पालकांच्या सभा घेण्याची संस्थेला आवश्यकता वाटत नाही. जे काही सांगायचे असेल, ते थेट विद्यार्थ्यांनाच सांगण्याची पारदर्शकता हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी विधी, इतिहास, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, उद्योगजगत, साहित्य, माध्यमे आणि राजकारणात ख्यातनाम पावले असून अनेक तज्ज्ञांना नोबेल पारितोषिक मिळाले आहेत. विविध क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींची संक्षिप्त यादी : (१) क्लेमेंट ॲटली – ब्रिटिश पंतप्रधान. (२) जोमो केनेटा – अध्यक्ष, केनिया. (३) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर – भारताचे राज्यघटनाकार, सामाजिक सुधारणेचे प्रणेते. (४) ली कुआन यी – पंतप्रधान सिंगापूर. (५) अमर्त्य सेन – अर्थशास्त्र नोबेल विजेते, भारत.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधील विविध क्षेत्रांतील नोबेल विजेते
अ. क्र. | वर्ष | विजेत्याचे नाव | क्षेत्र |
१ | १९२५ | जॉर्ज बर्नार्ड शॉ | साहित्य |
२ | १९५० | राल्प बंच | शांतता |
३ | १९५० | बर्ट्रंड रसेल | साहित्य |
४ | १९५९ | फिलीप नोएल | शांतता |
५ | १९७२ | सर जॉन हिक्स | अर्थशास्त्र |
६ | १९७४ | फ्रेडरिक हायेक | अर्थशास्त्र |
७ | १९७७ | जेम्स मिड | अर्थशास्त्र |
८ | १९७९ | सर विल्यम आर्थर लूइस | अर्थशास्त्र |
९ | १९८७ | ऑस्कर अरीयाडा सांझे | शांतता |
१० | १९९० | मर्टन एच. मिलर | अर्थशास्त्र |
११ | १९९१ | रोनाल्ड कोझ | अर्थशास्त्र |
१२ | १९९८ | अमर्त्य सेन | अर्थशास्त्र |
१३ | १९९९ | रॉबर्ट ए. मुंडेल | अर्थशास्त्र |
१४ | २००१ | जॉर्ज ऑर्थर अकेरलॉफ | अर्थशास्त्र |
१५ | २००७ | लिओनिद हर्विझ | अर्थशास्त्र |
१६ | २००८ | पॉल रॉबिन क्रूगमन | अर्थशास्त्र |
१७ | २०१० | सर ख्रिस्तोफर ए. पिसाराइडेज | अर्थशास्त्र |
१८ | २०१६ | जुआन मॅन्युएल सांतोस | शांतता |
१९ | २०१६ | ऑलिव्हर हार्ट | अर्थशास्त्र |
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि केंब्रिज विद्यापीठ या दोन आघाडीच्या संस्थांमधील वैचारिक वाद अर्थतज्ज्ञांमध्ये सुप्रसिद्ध आहे. याचा उगम लंडन स्कूलच्या एडविन कॅनन आणि केंब्रिज विद्यापीठातील राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक ॲल्फ्रेड मार्शल या दोन प्रख्यात अर्थतज्ज्ञांमधील वैचारिक मतभेदात आहे. अर्थशास्त्राला जैविक रीत्या संपूर्ण आणि स्वतंत्र स्थान दिले जावे की, नाही यावर हा वाद सुरू झाला. मार्शल यांना लंडन स्कूलने दिलेले आर्थिक सिद्धांताचे स्वतंत्र स्थान आणि आर्थिक इतिहासावरचा भर मान्य नव्हता. तसेच या वादात अर्थतज्ज्ञांची भूमिका स्वतंत्र, अलिप्त की व्यावहारिक सल्लागाराची असावी यावरही विचारसंघर्ष झाला. इ. स. १९२० – १९३० च्या दरम्यान या दोन्ही संस्थांमधील हा वैचारिक संघर्ष जोमाने सुरू होता. इ. स. १९३० च्या दशकातील महामंदीने निर्माण केलेल्या आर्थिक समस्या कशा सोडवाव्यात, यावरही जोरदार विचारमंथन होत होते.
केन्स – हायेक वाद : या वैचारिक वादातील प्रमुख सहभाग केंब्रिज विद्यापीठाचे जे. एम. केन्स आणि लंडन स्कूलचे फ्रेडरिक हायेक या दोन प्रख्यात अर्थतज्ज्ञांचा होता. तसेच लंडन स्कूलचे लिओनील रॉबिन्स यांनीही या वादात मोठा सहभाग घेतला. मागणीचे व्यवस्थापन करणे हा तत्कालीन आर्थिक समस्येवर उपाय होऊ शकतो, या विचारापासून सुरू झालेल्या या वैचारिक मतप्रवाहाने अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्रातील अनेक व्यापक संकल्पनांचा ऊहापोह केला. आज केन्सवादी अर्थशास्त्र या नावाने ओळखले जाणारे अनेक विचार केन्स यांनी याच काळात या वादविवादाद्वारे मांडले. यात शासन आणि सार्वजनिक क्षेत्राला प्रमुख भूमिका देण्यात आली होती, तर हायेक आणि रॉबिन्स यांनी ऑस्ट्रियन विचारधारेचा स्वीकार करून मुक्त व्यापाराला पाठिंबा दिला आणि शासकीय सहभागाला विरोध केला. इकॉनॉमिस्ट या ब्रिटिश पाक्षिकानेही या संस्थेच्या कामाची नोंद घेतली आहे.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेचा विधी, उद्योगजगत, राज्यशास्त्र या क्षेत्रांवर वैचारिक प्रभाव आहे.
संस्थेच्या संचालकांची नावे
अ. क्र. | संचालक | कार्यकाळ |
१ | विल्यम हेविन्स | १८९५ – १९०३ |
२ | सर हॅलफोर्ड मॅकिंडर | १९०३ – १९०८ |
३ | ऑन. विल्यम पेम्बर रीव्हज | १९०८ – १९१९ |
४ | लॉर्ड बिव्हरेज | १९१९ – १९३७ |
५ | सर अलेक्झांडर कार-साँदर्स | १९३७ – १९५७ |
६ | सर सिडने केन | १९५७ – १९६७ |
७ | सर वॉल्टर ॲडम्स | १९६७ – १९७४ |
८ | लॉर्ड डॉरेनडॉर्फ | १९७४ – १९८४ |
९ | इंद्रप्रसाद गोवर्धन पटेल | १९८४ – १९९० |
१० | सर जॉन ॲशवर्थ | १९९० – १९९६ |
११ | लॉर्ड गिडन्स | १९९६ – २००३ |
१२ | सर हॉवर्ड डेविस | २००३ – २०११ |
१३ | श्रीमती ज्युडिथ रीस | २०११-१२ |
१४ | क्रेग कालहॉन | २०१२ – १६ |
१५ | श्रीमती ज्युलिया ब्लॅक | २०१६ – २०१७ |
१६ | श्रीमती नेमत शफिक | २०१७ – २०२३ |
१७ | इरिक न्यूमेयर | २०२३ |
आय. जी. पटेल हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर होते.
संदर्भ :
- Dahrendorf, Ralf, A History of the London School of Economics and Political Science, 1895 – 1995, U. K., 1995.
- Patel, I. G., An Encounter with Higher Education : My Years at LSE, U. K., 2004.
समीक्षक : अनील पडोशी