बस्ती हे आयुर्वेदात वर्णन केलेल्या पंचकर्मांपैकी एक कर्म होय. शरीरात गुदमार्गाने औषध प्रवेशित करण्याच्या क्रियेस बस्ती असे म्हणतात. बस्ती हा मूळ संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ मूत्राशयाची पिशवी असा आहे. पूर्वी बोकड इत्यादी प्राण्यांच्या मूत्राशयाच्या पिशवीच्या साहाय्याने हे कर्म केले जात असल्याने त्यास बस्ती हे नाव दिले गेले. शरीरातील वात, पित्त व कफ ह्या तीन दोषांपैकी वातदोषाचे स्थान हे प्रामुख्याने मोठे आतडे ह्या अवयवात असते. बस्तिकर्मात गुदमार्गाने मोठ्या आतड्यामध्ये औषध पोहोचविले जाऊन वातदोषाचे शमन केले जाते. तसेच स्वत:च्या सामर्थ्याने सर्व शरीरात पसरून इतर दोषांनाही खाली खेचून आणते व मोठ्या आतड्यात साचलेल्या मळासह शरीराबाहेर काढून टाकते. त्यामुळे बस्तीस अर्धी चिकित्सा असेही म्हटले जाते.

बस्तिकर्मापूर्वी रूग्णाच्या पोट, कंबर, मांडी इत्यादी अवयवांना तिळाच्या तेलाने हलक्या हाताने मर्दन केले जाते. नंतर वाफेने सर्व अवयवांना शेक दिला जातो. बस्ती देण्यासाठी रूग्णास डाव्या कुशीवर उजवा पाय पोटाशी घेऊन झोपवले जाते. त्यानंतर रूग्णाच्या गुदमार्गातून रबरी नळी तेलात बुडवून प्रवेशित केली जाते व त्याला औषधाने भरलेली सिरिंज (पिचकारी) किंवा पॉट जोडून बस्ती दिला जातो.

बस्तिकर्माचे प्रामुख्याने द्रव्य व स्थान यांनुसार तीन प्रकार पडतात.

() निरूह किंवा आस्थापन बस्ती : यामध्ये रोगानुसार विशिष्ट औषधांचा काढा वापरला जातो. त्यात आवश्यकतेनुसार मध, सैंधव मीठ, औषधी तूप, तेल इत्यादी मिसळले जाते. हा बस्ती साधारणत: एक लिटर मात्रेत अन्नाचे पूर्ण पचन झाल्यावर उपाशी पोटी दिला जातो. हा बस्ती साधारणत: एक तासात शरीराबाहेर पडावा अशी अपेक्षा असते.

() अनुवासन किंवा स्नेहबस्ती : यामध्ये तिळाचे तेल किंवा औषधी तेल व तूप वापरले जाते. हा साधारणत: जेवणानंतर दिला जातो. याचा एक प्रकार मात्राबस्ति आहे, ज्यात अल्पमात्रेत तेलाचा बस्ती रोज दिवसाभरात कधीही घेतला जातो. हा बस्ती पूर्ण दिवसभरही शरीरात राहू शकतो.

() उत्तरबस्ती : हा बस्ती पुरूषांमध्ये मूत्रमार्गातून व स्त्रियांमध्ये योनिमार्गातून दिला जातो. यासाठी औषधी तूप, तेल व काढे यांचा वापर केला जातो. हा बस्ती शरीरात शोषला जातो किंवा बाहेरही पडू शकतो. स्त्रियांमध्ये हा बस्ती देताना धातूची किंवा रबरी नळी वापरली जाते, तर पुरूषांमध्ये रबरी नळी वापरली जाते. ह्या नळीस औषधाने भरलेली सिरिंज जोडून बस्ती दिला जातो.

बस्तीच्या संख्येवरून त्याचे खालील तीन प्रकार पडतात.

(१) योगबस्ती : यात तेल व काढ्याचे आळीपाळीने ८ बस्ती दिले जातात. त्यात पहिला व शेवटचा बस्ती तेलाचा दिला जातो.

(२) कालबस्ती : यात तेल व काढ्याचे आळीपाळीने १५ बस्ती दिले जातात. त्यात पहिला व शेवटचे ३ बस्ती तेलाचे दिले जातात.

(३) कर्मबस्ती : यात तेल व काढ्याचे आळीपाळीने ३० बस्ती दिले जातात. त्यात पहिला व शेवटचे ५ बस्ती तेलाचे दिले जातात.

पहा : अनुवासन, उत्तरबस्ति, कटिबस्ति, जानुबस्ति, नस्य, पंचकर्म, पुरीष, बस्ति, रक्तमोक्षण, वमन, विरेचन.

संदर्भ :  

  • अष्टांगहृदय — सूत्रस्थान, अध्याय १९ श्लोक १ – अरूणदत्तटीका.
  • चरकसंहिता — सिद्धिस्थान, अध्याय श्लोक ४०-४१, ४७-४८; अध्याय श्लोक १७-१९.

                                                                        समीक्षक जयंत देवपुजारी