पॅसिफिक व अटलांटिक या महासागरांच्या खालोखाल जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा महासागर. इंडिया (भारत) या आपल्या देशाच्या नावावरूनच या महासागराला ‘इंडियन ओशन’ (हिंदी महासागर) हे नाव देण्यात आले आहे. हा जगातील सर्वांत लहान, भूशास्त्रीय दृष्ट्या सर्वांत तरुण आणि प्राकृतिक दृष्ट्या सर्वाधिक जटिल महासागर आहे. हिंदी महासागराचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ७,४९,०२,८०० चौ. किमी. असून सीमावर्ती सागरी भाग वगळता हे क्षेत्र सुमारे ७,३४,४०,००० चौ. किमी. आहे. जगातील एकूण महासागरीय क्षेत्राच्या सुमारे २० टक्के, तर पॅसिफिक महासागराच्या क्षेत्रफळाच्या निम्म्यापेक्षा कमी क्षेत्र या महासागराने व्यापले आहे. या महासागराची सरासरी खोली ३,७४१ मी. असून सर्वाधिक म्हणजे ७,४५० मी. खोली इंडोनेशियातील जावा बेटाच्या दक्षिण किनाऱ्याच्या अपतट भागात असलेल्या सूंदा खंदकातील जावा गर्तेत आहे. हिंदी महासागराच्या उत्तरेस आशिया, दक्षिणेस अंटार्क्टिका, पश्चिमेस आफ्रिका आणि पूर्वेस ऑस्ट्रेलिया खंड आहे. या महासागराचा बराचसा उत्तर भाग भूवेष्टित असून तेथे अनेक देशांच्या सीमा येऊन भिडल्या आहेत. उत्तरेस इराण, पाकिस्तान, भारत आणि बांगला देश यांच्या सीमा; पूर्वेस मलाया द्वीपकल्प, इडोनेशियाची सूंदा बेटे आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सीमा, दक्षिणेस अंटार्क्टिका खंडाची, तर पश्चिमेस आफ्रिका खंड आणि अरेबियन द्वीपकल्पाची सीमा हिंदी महासागराला येऊन भिडलेल्या आहेत. या महासागराच्या पश्चिमेस असलेल्या आफ्रिकेच्या दक्षिण टोकापासून पूर्वेस ऑस्ट्रेलियापर्यंतचा कमाल विस्तार सुमारे १०,००० किमी. असून उत्तरेस पाकिस्तानच्या किनाऱ्यापासून ‘दक्षिण महासागरा’पर्यंतचा उत्तर-दक्षिण कमाल विस्तार ९,००० किमी. आहे. हिंदी महासागराचा ६०° द. अक्षवृत्ताच्या दक्षिणेकडील अंटार्क्टिका खंडापर्यंतचा भाग दक्षिण महासागर (सदर्न ओशन) या नावाने ओळखला जातो. हिंदी महासागराची सागरी सीमा अगदी काटेकोरपणे सांगता येत नाही. पश्चिमेस अटलांटिक व हिंदी महासागर यांच्या दरम्यान नैसर्गिक सीमा नसली, तरी ती सामान्यपणे आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाशी असलेल्या केप अगुल्हास या भूशिरापासून दक्षिणेस अंटार्क्टिकाच्या किनाऱ्यापर्यंत २०° पू. रेखांशाला अनुसरून मानली जाते; तर पूर्वेस पॅसिफिक महासागराशी असलेली सीमा मलाया द्वीपकल्प, सुमात्रा व जावा बेटे, तिमोर समुद्र, ऑस्ट्रेलिया खंड व टास्मानिया बेटापर्यंत मानली जाते. त्यानंतरची सीमा टास्मानियाच्या दक्षिण टोकापासून अंटार्क्टिका किनाऱ्यापर्यंत सामान्यपणे १४७° पू. रेखांशाला अनुसरून मानण्यात येते.
हिंदी महासागराची दक्षिण सीमा निश्चित करणारा कोणताही आंतरराष्ट्रीय करार झालेला नाही; परंतु ऑस्ट्रेलियात सामान्यत: हिंदी महसागराबरोबरच पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरांचा दक्षिणेकडील अंटार्क्टिका खंडाजवळचा विस्तार म्हणजे दक्षिण (अंटार्क्टिक) महासागर असल्याचे मानतात. ऑस्ट्रेलियन नेहमीच त्यांच्या खंडाच्या दक्षिण किनाऱ्याच्या दक्षिणेकडील महासागरी विस्तारास दक्षिण महासागर असेच संबोधतात. हिंदी महासागराच्या उत्तरेस भारत हा देश असून भारतीय द्वीपकल्पामुळे पश्चिमेकडील अरबी समुद्र आणि पूर्वेकडील बंगालचा उपसागर हे हिंदी महासागराचे उत्तरेकडील दोन प्रमुख फाटे निर्माण झाले आहेत. हिंदी महासागराच्या सीमावर्ती भागांत तुलनेने कमी सागरी भाग आहेत. पश्चिमेकडून पूर्वेकडे अनुक्रमे मोझँबीक चॅनेल, तांबडा समुद्र, एडनचे आखात, पर्शियन आखात, ओमानचे आखात, अरबी समुद्र, कच्छचे आखात, खंबायतचे आखात, बंगालचा उपसागर, मानारचे आखात, अंदमान समुद्र, तिमोर समुद्र व ग्रेट ऑस्ट्रेलियन बाइट हे महत्त्वाचे सागरी भाग आहेत. बाब-एल्-मांदेब सामुद्रधुनी, हॉर्मुझ, लाँबॉक, पाल्क, मलॅका व सूंदा इत्यादी या महासागराच्या सीमावर्ती भागातील प्रमुख सामुद्रधुनी आहेत. टास्मानिया आणि ऑस्ट्रेलिया यांदरम्यान असलेला बॅस सामुद्रधुनीचा प्रदेश काही जण हिंदी महासागराचा भाग मानतात, तर काही जण तो पॅसिफिक महासागराचा भाग असल्याचे मानतात. हिंदी महासागरात असणारी मादागास्कर, बहारीन, कॉमोरो, मालदीव, सेशेल्स, मॉरिशस, सिसिली, श्रीलंका, इंडोनेशियन द्वीपसमूह ही सर्व बेटे स्वतंत्र देश आहेत.
अटलांटिक व पॅसिफिक महासागरांच्या तुलनेत हिंदी महासागर अनेक बाबतींत वेगळा आहे. हिंदी महासागर उत्तर गोलार्धात भूवेष्टित असल्यामुळे तो आर्क्टिक महासागरापासून तसेच समशीतोष्ण आणि शीत कटिबंधीय थंड पट्ट्यापासून दूर आहे. या महासागरात मर्यादित बेटे आणि अरुंद सागरमग्न खंडभूमी आढळते. हिंदी महासागर हा एकमेव असा महासागर आहे की, येथे असमान आणि उत्तर भागात अर्धवार्षिक परिवर्तनीय पृष्ठीय अभिसरण प्रवाह आढळतात. या महासागराला तळाच्या पाण्याचे स्वतंत्र उद्गम नाहीत, तर ते उद्गममार्ग त्या महासागराच्या सीमाक्षेत्राबाहेर आहेत. तांबडा समुद्र आणि पर्शियन आखात हे या महासागराला सर्वाधिक लवणमय पाणीपुरवठा करणारे दोन उद्गम मार्ग आहेत. या महासागराच्या विशेषत: उत्तर भागात पृष्ठीय पाण्याच्या थराखालील पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण फारच कमी असते.
हिंदी महासागराच्या संदर्भात मराठी विश्वकोशात पुढील शीर्षकांनी स्वतंत्र नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. | |||
अ. क्र. | नोंदींचे नाव | अ. क्र. | नोंदींचे नाव |
१ | हिंदी महासागराची तळरचना | ८ | हिंदी महासागरातील पर्यटन |
२ | हिंदी महासागराची निर्मिती व भूविज्ञान | ९ | हिंदी महासागरातील पर्यावरणावर मानवी व्यवसायांचा परिणाम |
३ | हिंदी महासागराची प्राकृतिक रचना | १० | हिंदी महासागरातील पाण्याचे तापमान व लवणता |
४ | हिंदी महासागराचे आर्थिक महत्त्व | ११ | हिंदी महासागरातील प्रवाह |
५ | हिंदी महासागराचे सामरिक महत्त्व | १२ | हिंदी महासागरातील भरती-ओहोटी |
६ | हिंदी महासागराचे समन्वेषण व संशोधन | १३ | हिंदी महासागरातील व्यापार व वाहतूक |
७ | हिंदी महासागराच्या तळावरील निक्षेप | १४ | हिंदी महासागरावरील हवामान |
समीक्षक : संतोष गेडाम