(प्रस्तावना) पालकसंस्था : म.रा.म.वि.नि.मंडळ, मुंबई | समन्वयक : वसंत चौधरी | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
भूगोल या नावाने परिचित असलेला विषय ‘भूगोलविद्या’ किंवा ‘भूवर्णनशास्त्र’ म्हणूनही ओळखला जातो. या विषयाची व्याप्ती लक्षात घेता विश्वकोश रचनेमध्ये याचे निश्चितच अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘पृथ्वीसंबंधी माहिती देणारे शास्त्र’ अशी जरी याची सुटसुटीत व्याख्या असली, तरी आता ‘जगासंबंधी किंबहुना जगाच्या पृष्ठभागासंबंधी माहिती देणारे शास्त्र’ असे म्हणणे जास्त उचित ठरेल; कारण या विषयामध्ये मुख्यत्वे भूपृष्ठवर्णनाचा समावेश होतो. प्राकृतिक भूगोल व मानव भूगोल असे याचे प्रामुख्याने दोन भाग पाडून भूपृष्टाचे वर्णन केले जाते. प्राकृतिक भूगोलामध्ये विविध भूरूपे, खडक, हवामान, नैसर्गिक संपत्ती-साधने इत्यादींच्या माहितीचा अंतर्भाव होतो; तर मानव भूगोलामध्ये विविध देश, विभाग, प्राचीन व अर्वाचीन स्थळे, शेती, दळणवळण इत्यादींचा समावेश होतो. त्याचबरोबर विविध शोध व शोधक यांचीही माहिती समाविष्ट असते. यांशिवाय मानव व पर्यावरण यांचे परस्पर व नेहमी बदलणारे संबंध व त्यांचे पृथ:करणात्मक विवेचन करणे, हा आधुनिक भूगोलशास्त्राचा वाढता दृष्टिकोन आहे. त्यामुळे आता अन्य सामाजिक शास्त्रांबरोबरच नैसर्गिक शास्त्रांमध्ये म्हणजे विज्ञानातही भूगोलशास्त्राचे स्थान महत्त्वाचे मानले जात आहे.
अठराव्या शतकापर्यंत भूगोलशास्त्राचे स्वरूप प्रामुख्याने स्थळांपुरतेच मर्यादित होते. त्यानंतर मात्र भौगोलिक अभ्यासाच्या साधनसामग्रीबरोबरच मानवाच्या जिज्ञासेतही वाढ होत गेली. भूगोलविषयक निरीक्षण व विश्लेषण यांच्या कार्यपद्धतीतही क्रांतिकारक बदल घडून आले. त्यातूनच काही विषयांचे भूगोलशास्त्राशी अर्थपूर्ण संयोजन होऊन त्याच्या विविध उपशाखा निर्माण झाल्या. उदा., राजकीय भूगोल, प्राणिभूगोल, मृदा भूगोल, आर्थिक भूगोल, वाणिज्य भूगोल, सामाजिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, नागरी भूगोल, वैद्यक भूगोल, पर्यावरण भूगोल, लोकसंख्या भूगोल, वाहतूक भूगोल, लष्करी भूगोल इत्यादी. विसाव्या व एकविसाव्या शतकांत मानव-पर्यावरण, मानवी परिस्थितीविज्ञान, प्रादेशिक भिन्नत्त्व, भू-राज्यशास्त्र इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून भूगोल विषयाकडे पाहिले जाऊ लागले आहे.
हे विविधांगी ‘भूवर्णनशास्त्र’ आपल्या भाषेत नुसते वाचून समजून घेण्यापेक्षा नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य तेथे दृक्-श्राव्य स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचविता आल्यास ते लवकर आत्मसात होईल, हा मुख्य उद्देश भूगोल ज्ञानमंडळाने डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यासाठी यथास्थळी चलत् चित्रफिती, ध्वनी, सचेतनीकरण (अॅनिमेशन), आकृत्या इत्यादींद्वारे जिज्ञासूंना अचूक माहिती संगणकाच्या माध्यमातून पुरविण्याचे योजिले आहे. त्यादृष्टीनेच सर्वसामान्य वाचक, अभ्यासक, संशोधक इत्यादींना मराठी विश्वकोशातील भूगोल विषयाच्या या नवीन स्वरूपाचा निश्चितच फायदा होणार आहे.