एक ईजिप्शियन देवता. ईजिप्शियन पुराणकथेनुसार या देवतेला मृतांची देवी म्हटले जाते. ही प्राचीन ईजिप्शियन वृश्चिकदेवता असून तिची सरकित, सेलकेत, सेलकित आणि सेलकिस ही नावेदेखील काही ठिकाणी प्रचलित आहेत. ही रक्षणकर्ती देवता असल्याने सर्पदंश व वृश्चिकदंशापासून संरक्षण करते. उत्तर न्यूबिया येथील नाईल नदीजवळील सेलचिस (Pselchis) हे या देवतेचे मूळ स्थान मानले जाते.
सुरुवातीला विंचवाचे प्रतीकात्मक स्वरूप असलेल्या ह्या देवतेला नंतरच्या काळात मानवी स्वरूप देण्यात आले. नांगी मारायला शेपूट वर केलेल्या विंचवाचे मस्तक असलेली स्त्री किंवा स्त्रीचे मस्तक असलेला विंचू असे तिचे मूर्त स्वरूप आढळते. एकविसाव्या वंशातील सापडलेल्या पपायरसवरील काही कथांनुसार सेल्केत ही देवता स्त्रीचे शरीर असलेली आणि पाठीतून सिंहीण व मगरीचे मस्तक बाहेर आलेली अशी आहे. उजव्या हातात शक्तीचे प्रतीक असलेला दंड व डाव्या हातात प्राणाचे प्रतीक असे ईजिप्शियन प्रतीक ‘अंख’ आहे. तुतांखामेनच्या थडग्यातील राजाचे रक्षण करण्याऱ्या चार देवतांपैकी एक असलेली सेल्केतची सुवर्णप्रतिमा सर्वांत जास्त लोकप्रिय आहे.
सेल्केत किंवा सेर्केतचा शब्दश: अर्थ ‘जिच्यामुळे गळा श्वास घेतो’ (she who causes throat to breathe) किंवा ‘जी गळा थंड ठेवते’ (Selket ehut – who cools throats) असा आहे. ती अद्भुत जादुई शक्तींची आश्रयदाती व पुस्तकालयाशी संबंधित शिक्षकदेवता म्हणूनही ओळखली जाई. दक्षिणेकडील पाताळातील भाग्यदेवतेशीदेखील सेल्केत देवतेचे साम्य मानले जाई.
मृत व्यक्तीचे शव सुरक्षित ठेवण्याच्या क्रियेत (ceremony of embalming) सेल्केतचा महत्त्वाचा सहभाग होता. सेल्केत देवता इसिस, नीथ आणि नेफ्थिस ह्या देवतांबरोबर ओसायरिस देवतेच्या अवयवांचे रक्षण करते, म्हणून ती मृत शवांचे व त्यांच्या उदरातील महत्त्वाच्या अवयवांचे (viscera) रक्षण करणारी देवता मानली गेली.
सेल्केतसंबंधित अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत, त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे : डेर-एल्-बाहरी आणि हॅटशेपसूट ह्या ईजिप्तमधील प्रसिद्ध दफनभूमितील मंदिरांमध्ये सेल्केत आणि नीथ देवतांचे चित्र रेखाटलेले आढळते. ॲमन देवता जेव्हा हॅटशेपसूटच्या मातेला गर्भार करत असताना सेल्केत आणि नीथ देवता त्या दोघांचे सर्व अडथळ्यांपासून रक्षण करतात. दुसऱ्या आख्यायिकेत सेल्केत आणि नीथ या देवता ॲमन आणि त्याच्या पत्नीला एकांत मिळावा म्हणून सदैव जागरूक असतात, असे म्हटले आहे. काही लेखांनुसार सेल्केत ही रा सूर्यदेवतेची मुलगी असून तिला विवाहाशी संबंधित किंवा वैवाहिक मिलनातील संरक्षक देवता मानली गेली आहे.
पहिल्या वंशातील एका लेखात तिचा ‘खेरेप सेर्केत’ आणि पाचव्या वंशातील एका लेखात तिचा ‘सा सार्केत’ असा उल्लेख आढळतो. ज्याचा अर्थ ‘सार्केतचे संरक्षण’ असा आहे. विषारी दंशावर उपचार करण्याच्या अद्भुत शक्ती तिच्याजवळ आहेत आणि चूक करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा म्हणून ती दंश करण्यासाठी सर्प आणि विंचू पाठवते असा समज होता, असे दिसते.
थडग्यातील एका लेखानुसार ईजिप्शियन फेअरोंचे सर्पदंशापासून रक्षण करणाऱ्या नेहेब खॉ ह्या जमिनीखालील सर्पदेवतेची सेल्केत माता होती. दुसऱ्या एका लेखानुसार सेल्केतने ॲपोफिस नावाच्या अत्यंत खुनशी सर्पाला ताळ्यावर आणले. काही शाही थडग्यांमध्ये रेखाटलेल्या पाताळातील चित्रामध्ये सेल्केत स्वत: सर्पस्वरूपात आढळते. असे असले, तरी अनेक विंचूदंशाशी संबंधित असलेल्या मंत्रांमध्ये मात्र तिचा प्रत्यक्ष उल्लेख सापडत नाही.
एका आख्यायिकेनुसार सेल्केतने इसिस देवता आणि तिचे लहान बाळ होरस ह्यांचे सेथ देवतेपासून रक्षण केले. जेव्हा सेथ देवतेने पाठवलेला सर्प होरसला दंश करायला आला, तेव्हा सेल्केतने विनंती केल्याने रा देवाने आपली सूर्यनौका थांबवून होरसला मदत केली. ह्या आख्यायिकेनुसार सेल्केत गरोदर स्त्रिया व लहान मुले ह्यांचे विषारी दंशापासून रक्षण करणारी देवता असल्याचे मानले जाते. आई व बाळाचे शरीररक्षक असलेल्या सात विंचवांचा संबंध सेल्केतशी जोडला गेला आहे. मृतात्म्याच्या पुस्तकात सेल्केतला मृतांच्या दातांची देवता म्हटले आहे.
दुसर्या रॅमसीझची पत्नी नेफरतीती हिच्या थडग्यात सेल्केतचे चित्र रेखाटलेले आहे. त्यानुसार सेल्केत नेफरतीती राणीचे मृतांच्या जगात स्वागत करते आणि म्हणते, “मी सेल्केत, स्वर्गाची व सर्व देवांची रक्षणकर्ती. मी तुझ्या अगोदर येऊन तुझ्यासाठी पवित्र स्थानी जागा निश्चित केली आहे, जेणेकरून तू स्वर्गात रा देवासारखी तेजस्वी आणि रमणीय बनून राहशील”.
संदर्भ :
- Hamlyn, Paul, Egyptian Mythology, London, 1965.
- Hart, George L. A dictionary of Egyptian Gods and Goddesses, London, 1986.
- https://ancientegyptonline.co.uk/serqet/
समीक्षक : शकुंतला गावडे