चित्त आणि चित्तवृत्ती : चित्त हा शब्द सामान्यपणे ‘मन’ या अर्थाने वापरतात. महर्षी पतंजलींनी चित्ताची स्पष्ट व्याख्या ‘योगसूत्रां’त केलेली नाही, परंतु चित्त ही योगदर्शनातील एक पारिभाषिक संज्ञा आहे. योगदर्शन हे सांख्यदर्शनात प्रतिपादन केलेल्या पंचवीस तत्त्वांचा स्वीकार करते. त्यातील बुद्धी (महत्), अहंकार आणि मन या तीन तत्त्वांना एकत्रित रूपाने योगदर्शनात ‘चित्त’ म्हटले जाते, असे ‘योगवार्त्तिक’ ग्रंथात विज्ञानभिक्षूंनी, तर या तिघांपैकी मुख्यत्वेकरून ‘बुद्धी’ म्हणजे चित्त होय, असे वाचस्पतिमिश्र यांनी ‘तत्त्ववैशारदी’ या ग्रंथात प्रतिपादित केले आहे. सदर नोंद आस्तिक षड्दर्शनांपैकी योगदर्शनातील ‘चित्त’ या संकल्पनेवर आधारित आहे.

सांख्यदर्शनानुसार मन, अहंकार आणि बुद्धी यांचे कार्य पुढीलप्रमाणे आहे : इंद्रियांद्वारे एखाद्या वस्तूचे ग्रहण किंवा आलोचन केले जाते, त्यानंतर पूर्वानुभवाच्या आधारे त्याला ओळखण्याची क्रिया ‘मन’ करते. या क्रियेला ‘संकल्प’ म्हणतात. त्यानंतर ती वस्तू स्वत:साठी योग्य आहे की अयोग्य, याप्रकारे वस्तूच्या उपयुक्ततेचा विचार ‘अहंकार’ करतो. या क्रियेला ‘अभिमान’ म्हणतात. त्यानंतर ‘बुद्धी’ त्या वस्तूशी संबंधित निर्णय घेते किंवा वस्तूच्या स्वरूपाविषयी निश्चय करते. या क्रियेला ‘अध्यवसाय’ म्हणतात.

सांख्यदर्शनाचे प्रयोजन वेगवेगळ्या तत्त्वांचे स्वरूप सांगून त्यातील भेद स्पष्ट करणे हे असल्यामुळे सांख्यदर्शनात मन, अहंकार आणि बुद्धी या तिघांचीही गणना वेगवेगळी तत्त्वे म्हणून केली आहे; परंतु एकाच अंतःकरणाचे हे तीन वेगवेगळे आयाम आहेत, यादृष्टीने योगदर्शनामध्ये तिघांनाही ‘चित्त’ या शब्दाने सूचित केले आहे.

योगदर्शनामध्ये ‘चिति किंवा पुरुष’ आणि ‘चित्त’ अशा दोन वेगवेगळ्या तत्त्वांचे प्रतिपादन केले आहे. ‘चिति’ म्हणजे ज्यामध्ये जाणण्याची शक्ती आहे आणि ज्याला ज्ञान होते ते साक्षीभूत तत्त्व आणि ‘चित्त’ म्हणजे ज्याद्वारे ज्ञान होते ते साधन होय. ‘चिति’ आणि ‘चित्त’ हे दोन्ही शब्द ‘चित्’ या संस्कृत धातूपासून बनलेले असून त्याचे यथार्थ ज्ञान, स्मृती आणि चेतना (जाणीव) असे तीन वेगवेगळे अर्थ होतात. यापैकी चेतना असा अर्थ योगदर्शनामध्ये अभिप्रेत आहे. ‘चिति’ हे तत्त्व म्हणजे चेतना होय. चितीच्या संयोगामुळे स्वभावाने अचेतन असणारी मन, अहंकार आणि बुद्धी ही तत्त्वेही क्रियाशील होतात. उदा., सूर्याच्या ‘प्रकाशा’मुळे चंद्र ‘प्रकाशित’ होतो, तसेच चितीच्या ‘चेतने’मुळे ही जडतत्त्वेही ‘चित्त’ अर्थात प्रकाशित झाल्यासारखी होतात आणि चेतन असल्यासारखी भासतात. हा अर्थ सूचित करण्यासाठी योगदर्शनामध्ये मन, अहंकार आणि बुद्धी यांना एकत्रितपणे ‘चित्त’ या शब्दाने संबोधित केले आहे.

चित्तवृत्ती : ‘वृत्ति’हा शब्द संस्कृत धातू ‘वृत्-वर्त्’ यापासून बनलेला असून त्याचा अर्थ ‘—च्या रूपाने राहणे’ असा आहे. ज्यावेळेला चित्त कोणत्या तरी वस्तूचा आकार धारण करते आणि काही काळासाठी त्या वस्तूच्या रूपात राहते, त्या चित्ताच्या रूपाला ‘चित्तवृत्ती’ म्हणतात. सामान्य भाषेत वृत्तींनाच विचार म्हणतात. चित्त हे दुसऱ्या वस्तूच्या स्वरूपाचे अनुकरण करते.

चित्तामध्ये एकानंतर एक अशा विविध वृत्ती उत्पन्न होतात आणि अशा असंख्य वृत्तींचे ज्ञान पुरुषाला प्राप्त करावे लागते. ज्यावेळेस चित्तवृत्ती निरुद्ध होतात, त्यावेळी पुरुषाला कोणतेही ज्ञान होत नाही. चित्ताच्या याच स्थितीला ‘योग’ म्हणतात. वेगवेगळ्या वस्तूंचा ग्रहण केलेला आकार हे चित्ताचे मूळ रूप नाही, तर ते त्याचे तात्कालिक रूप होते. दुसऱ्या कोणत्याही वस्तूचा आकार धारण न करता राहणारे (म्हणजेच कोणतीही वृत्ती नसलेले) निरुद्ध चित्त हेच त्याचे मूळ स्वरूप होते.

बाह्य जगतातील वस्तूंचे (उदा. फुले, फळे, खुर्ची, टेबल इ.) ज्ञान आपल्याला होत असले तरी योगदर्शनानुसार त्या वस्तूंचे नाही, तर चित्ताने ग्रहण केलेल्या त्या वस्तूच्या आकाराचे अर्थात वृत्तीचे ज्ञान होते. म्हणूनच समोर एकच वस्तू असली तरीही अनेक व्यक्तींना होणारे त्या एकाच वस्तूचे ज्ञान वेगवेगळे असते. प्रत्येक व्यक्तीचे चित्त एकाच वस्तूचा आकार वेगवेगळ्या पद्धतीने किंवा एकाच वस्तूच्या वेगवेगळ्या आयामांचे आकार धारण करत असते. डोळे बंद केल्यानंतरही डोळ्यासमोर कोणती ना कोणती वस्तू येते, ती वस्तुतः चित्तवृत्तीच असते. जसे डोळे बंद केल्यानंतरही चित्तवृत्तीचे ज्ञान आपल्याला होते, तसेच डोळे उघडल्यावरही समोर प्रत्यक्ष दिसणाऱ्या वस्तूचे नव्हे, तर तिचा आकार घेतलेल्या चित्तवृत्तीचे आपल्याला ज्ञान होते, हा योगदर्शनातील सिद्धान्त आहे.

चित्तामध्ये एकानंतर एक उत्पन्न होणाऱ्या अनेक वृत्तींचा अनुभव पुरुषाला प्राप्त करून घ्यावाच लागतो. चित्तामध्ये वृत्ती किंवा विचार उत्पन्न झाले, परंतु त्यांना न अनुभवताच ते नष्ट झाले असे होत नाही.

चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या असंख्य चांगल्या आणि वाईट वृत्तींना अनुभवावेच लागते. एका दिवसात एक व्यक्ती सरासरी २१,६०० वेळा श्वास घेते आणि साधारणपणे तेवढ्याच वृत्ती व्यक्तिच्या चित्तात उत्पन्न होतात. चित्तामध्ये निरंतर उत्पन्न होणाऱ्या या असंख्य विचारशृंखला किंवा वृत्ती ती व्यक्ती एकदम थांबवू शकत नाहीत. त्यामुळे अनेक वृत्तींना हळूहळू कमी करत करत एक वृत्ती आणि नंतर त्या एक वृत्तीला निरुद्ध केल्यावर शून्य वृत्ती हा योगाचा प्रवास आहे.

असंख्य प्रकारच्या चित्तवृत्तीचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे तीन पद्धतीने करता येते :

(१) क्लिष्ट आणि अक्लिष्ट वृत्ती: योगदर्शनानुसार सामान्य व्यक्तीच्या चित्तामध्ये अविद्या (विपरीत ज्ञान), अस्मिता (मी-पणाची भावना), राग (आसक्ती), द्वेष आणि अभिनिवेश (मृत्यूचे भय) या पाच प्रकारांचे क्लेश असतात. जोपर्यंत त्रिगुणात्मक प्रकृती आणि पुरुष यांच्यातील भेदाचे ज्ञान उत्पन्न होत नाही, तोपर्यंत चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व वृत्ती क्लेशांनी प्रभावित असतात. परंतु हे ज्ञान झाल्यावर चित्तात क्लेशांचा प्रभाव राहत नाही, चित्तात उत्पन्न होणाऱ्या या सर्व चित्तवृत्ती या क्लेशरहित चित्तवृत्ती असतात.

(२) प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती : यथार्थ ज्ञान देणारी चित्तवृत्ती म्हणजे प्रमाण. उदा., फूल दिसत असताना चित्तामध्येही फुलाच्याच आकाराची वृत्ती उत्पन्न होणे. ज्या वृत्तीमुळे एखाद्या विषयाचे भ्रमयुक्त ज्ञान होते, ती वृत्ती म्हणजे विपर्यय. उदा., चमकणारा शिंपला समोर असताना त्याऐवजी चित्तामध्ये चांदीच्या आकाराची वृत्ती उत्पन्न होणे. शब्दांच्या सामर्थ्याने ऐकणाऱ्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होणारे काल्पनिक वस्तूच्या आकाराची वृत्ती म्हणजे विकल्प वृत्ती. उदा., पंख असलेला माणूस म्हंटले, तर ते ऐकल्यावर काल्पनिक पंख असलेल्या माणसाच्या आकाराची वृत्ती चित्तात उत्पन्न होणे. सुषुप्ती अर्थात गाढ झोपेच्या अवस्थेमध्ये सर्व वस्तूंच्या अभावाची जाणीव करवून देणाऱ्या वृत्तीला निद्रा वृत्ती म्हटले जाते. पूर्वी अनुभवलेल्या विषयाचे पुन्हा चित्तामध्ये स्मरण झाले असता त्याच वस्तूचा आकार पुन्हा चित्तामध्ये प्रतिबिंबित होणे ही स्मृती वृत्ती होय.

(३) कल्पिता आणि अकल्पिता वृत्ती : चित्त शरीराशी संबंधित असतांना त्याची केवळ वृत्ती शरीराच्या बाहेर उत्पन्न होते, तिला कल्पिता किंवा विदेहा वृत्ती म्हणतात. मात्र काही विशिष्ट साधनेद्वारे योगी चित्ताला स्वतःच्या शरीरातून बाहेर काढू शकतात आणि वृत्तीही बाहेरच उत्पन्न होतात. अशा वृत्तींना अकल्पिता किंवा महाविदेहा वृत्ती म्हणतात.

चित्ताच्या संपूर्ण वृत्तींचा निरोध म्हणजे योग होय. सर्व वृत्तींचा निरोध झाला असता चित्ताची होणारी स्थिती म्हणजे असम्प्रज्ञात होय. या अवस्थेत पुरुषाला कोणत्याही विषयाचे ज्ञान प्राप्त होत नाही आणि तो आपल्या मूळ स्वरूपात अवस्थित राहतो.

पहा : चित्तवृत्ति व स्वभावधर्म, चित्तविकृति, योगदर्शन

संदर्भ :

  • कर्णाटक विमला, ‘पातञ्जल-योगदर्शनम्’, रत्ना पब्लिकेशन्स, वाराणसी, १९९२
  • ब्रह्मलीन मुनि, ‘पातञ्जल-योगदर्शन’, चौखम्भा प्रकाशन, वाराणसी, २०१०

समीक्षक : कला आचार्य


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.