जीवसृष्टी आणि पर्यावरण यांचे एकविसाव्या शतकातील वाढते महत्त्व लक्षात घेऊन कुमार विश्वकोशासाठी जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाची निवड अग्रक्रमाने करण्यात आली आहे. या खंडातील नोंदी सुटसुटीत, सोप्या भाषेत आणि रसपूर्ण असतील यावर भर देण्यात आला आहे. या खंडातील सर्व चित्रे रंगीत असावीत आणि प्रत्येक नोंदीला चित्र असावे असा कटाक्षही सर्वसाधारणपणे ठेवण्यात आला आहे.
सध्याच्या विज्ञानयुगात कुमारवयीन वाचकांना संगणकाची ओढ अधिक असते. म्हणूनच कुमार विश्वकोश ग्रंथरूपाने तसेच मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावरही सर्वांना वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे.
जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडात जीवशास्त्राच्या प्रमुख शाखा आणि उपशाखा यांची माहिती अंतर्भूत आहे. जीवशास्त्रात वापरण्यात येणाऱ्या प्रमुख संकल्पनांचे स्पष्टीकरण करणे, हे या खंडाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. उदा., जीवाची (वनस्पती किंवा प्राणी यांची) एकता, जीवसृष्टीत झालेली उत्क्रांती, जैविक विविधता, जीवाचे (वनस्पती, प्राणी यांचे) वर्तन आणि त्यांचे परस्परसंबंध, जीवांच्या शरीररचनेची तत्त्वे, पेशी, ऊतके आणि इंद्रिये, सूक्ष्मजीवशास्त्र, आनुवंशिकी, पर्यावरण, लोकसंख्येच्या वाढीने व आधुनिक उत्पादनतंत्रामुळे पर्यावरणावर झालेले दुष्परिणाम आणि त्यांच्यावरील उपाय इत्यादी. जीवशास्त्राचे इतर विज्ञानांशी (उदा., भौतिकी, रसायनशास्त्र इत्यादींशी) असलेले संबंध याचे विवेचन यात आहे. जीवशास्त्रातील उपपत्तींवर आधारलेली, विशेषत: शेती व पशुपालन, या क्षेत्रांत वापरण्यात येणारी उत्पादनतंत्रे व त्यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम यांविषयीचे विवेचन हा या खंडाचा महत्त्वाचा भाग आहे.