शिक्षणशास्त्र या विषयाचा संबंध अनेक विषयांशी प्रत्यक्षात अथवा अप्रत्यक्षात आहे. त्यामुळे अधिकाधिक घटकांना स्पर्श करण्याचा शिक्षणशास्त्र ज्ञानमंडळाचा प्रयत्न आहे. शिक्षणशास्त्राच्या अभ्यासकाला तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र या दोन्ही विषयांची ओळख असणे आवश्यक असते. त्या आधारावरच शिक्षणातील प्रमुख घटक अध्ययन-अध्यापन आणि अभ्यासक्रम यांचा मागोवा घेता येतो आणि त्या दृष्टिकोनातून विविध अध्यापन पद्धतींचा अवलंब करावा लागतो. भारतातील शिक्षण पद्धतींचा विचार करताना गुरुकुल पद्धतीपासून आधुनिक शिक्षण पद्धतींपर्यंतच्या स्थित्यंतरांचा मागोवा अपरिहार्य ठरतो.
आधुनिक शिक्षणात मानव्यविद्या शाखेतील विशेषत: सामाजिक विज्ञानांबरोबरच तंत्रविद्या व विज्ञान शाखेतील विषयांच्या अभ्यासाला प्राधान्य देणे क्रमप्राप्त ठरते. शिक्षणशास्त्रात संगणकासारखा विषय यापुढे अग्रक्रमाने अभ्यासाचा विषय असेल ! त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय शिक्षणाला एक नवा आयाम प्राप्त झाला आहे. साहजिकच आज शिक्षणाकडे पाहावयाच्या मूलगामी दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला आहे. त्यामध्ये शिक्षणाची उद्दिष्टे, अभ्यासक्रम, सार्वत्रिक शिक्षण, प्रौढ शिक्षण, स्त्री शिक्षण, सामाजिक शिक्षण, दुर्बल घटकांचे शिक्षण, प्रज्ञावान व गतिमंद शिक्षण, निरंतर शिक्षण, तंत्रशिक्षण व विज्ञान इत्यादी क्षेत्रांत नवीन शैक्षणिक विचारांची कालमानानुसार भर पडली आहे. तसेच भारतीय शिक्षणपद्धतीवर भारतीय विचारवंतांच्या प्रभावाबरोबरच पाश्चिमात्य विचारवंतांचा प्रभाव असल्यामुळे भारतीय शिक्षणपद्धतीत प्रयोगशीलता प्रविष्ट झाली आहे. विज्ञाननिष्ठ व संशोधनात्मक शिक्षणपद्धतीला आपातत: महत्त्व प्राप्त झाले आहे. तत्त्वज्ञानाचे विविध प्रणाली/विचारधारा आहेत. या विविध पंथात शिक्षणतज्ज्ञांनी वैचारिक भर टाकलेली आहे. प्रत्येक विचारवंतांच्या विचारावर तत्कालीन व आधुनिक कालखंडातील सामाजिक व राजकीय परिस्थितीचा प्रभाव असतो. त्यामुळे शिक्षणतज्ज्ञांच्या विचारांना विशिष्ट प्रणालीत समाविष्ट करतांना फार सावधगिरी बाळगावी लागते. अन्यथा त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाज परिवर्तनात शिक्षणाची भूमिका फार महत्त्वाची असते. शिक्षणशास्त्रात संरक्षण, संक्रमण आणि संवर्धन यांचा साकल्याने विचार केला जातो. एवढेच नव्हे, तर शिक्षणशास्त्र विषयामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होऊन ते देशाचे सुजाण नगरिक बनतात. त्यासाठी शिक्षण देणाऱ्या विविध संशोधनात्मक व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे स्थापन झाली आहेत. त्यांतून विविध विषयांचे मार्गदर्शन, अध्यापन व संशोधन करण्यात येते.
शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे महत्त्वपूर्ण साधन आणि महत्त्वपूर्ण घटक आहे. म्हणून विषयात संदर्भांकित माहितीचे संकलन करून योग्य अशी माहिती समाजापर्यंत पोहचविणे, हे शिक्षणशास्त्र ज्ञानमंडळाचे उद्दिष्ट आहे.